क्रिकेटच्या मैदानात धुरळा उडवणारी स्मृती मांधना

 

सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर पासून तर हल्लीच्या शार्दूल ठाकूर, केदार जाधव पर्यंत महाराष्ट्राला क्रिकेटपटूंचा मोठा वारसा लाभलेला आहे. पण आता क्रिकेटपटूंची नावं घेताना विसरता येणार नाही असं एक नाव क्रिकेटच्या मैदानात धुरळा उडवताना दिसतं. स्मृती मांधना ! सांगलीच्या स्मृती मांधनाची बॅटिंग बघून तुम्ही स्मृती आणि क्रिकेट दोघांच्या प्रेमात पडू शकता.

 

स्मृती दोन वर्षांची असताना तिचे वडील श्रीनिवास मांधना सांगलीला स्थायिक झाले. तेही जिल्हास्तरीय क्रिकेटपटू होते पण नंतर त्यांनी टेक्स्टाईलच्या व्यवसायात काम करायला सुरुवात केली. पण आपल्या मुलांनी आपलं क्रिकेटचं स्वप्न पूर्ण करावं ही इच्छा स्मृती आणि तिचा भाऊ श्रवण यांनी चांगलीच मनावर घेतली. श्रवण महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळलेला आहे. श्रवण कडे पहात स्मृतीलाही क्रिकेटची गोडी लागली. आपल्या भावसारखंच आपल्यालाही चौके-छक्के मारता यायला हवे असं वाटायला लागलं आणि स्मृतीची क्रिकेट खेळायला सुरुवात झाली.

 

स्मृतीच्या वडिलांना डावखुऱ्या फलंदाजांबद्दल विलक्षण आकर्षण होतं. आपल्या मुलांनाही डावखुऱ्या पद्धतीने फलंदाजी करता यायला हवी म्हणून त्यांनी स्मृती आणि श्रवण दोघांनाही डावखुऱ्या पद्धतीने फलंदाजीचं प्रशिक्षण दिलं.

 

वयाच्या नवव्या वर्षीच समहाराष्ट्राच्या पंधरा वर्षाखालील संघात आणि पुढे दोन वर्षांनंतर लगेचच महाराष्ट्राच्या एकोणीस वर्षाखालील संघात स्मृतीचा समावेश झाला आणि नंतर तिने मागे वळून पहिलंच नाही.

 

एकोणीस वर्षाखालील गुजरात विरुद्ध सामन्यात १५० चेंडूत २२४ धावा करून प्रथमश्रेणी क्रिकेट मध्ये द्विशतक करणारी पहिली महिला ठरण्याचा मान स्मृतीने मिळवला.

 

भारताकडून खेळण्याची संधी प्रत्येक खेळाडू शोधत असतो. स्मृतीला ५ एप्रिल २०१३ ला बांग्लादेशाविरुद्ध टी-२0 सामन्यात ही संधी मिळाली. त्यानंतर ५ दिवसांनी लगेचच तिला १० एप्रिल २०१३ ला एकदिवसीय संघात जागा मिळाली ती कायमची.

 

आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेट मध्ये पदार्पण करताना स्मृती अवघ्या अठरा वर्षांची होती. इतक्या लहान वयात आपल्या बॅटची जादू दाखवणारी स्मृती येत्या काळात अनेक महिला खेळाडूंना प्रेरित करत राहील यात शंका नाही.

 

स्मृतीच्या काही विशेष गोष्टी :

  • एकोणीस वर्षाखालील गुजरातविरुध्द सामन्यात २२४ धावा करताना वापरलेली बॅट स्मृतीला राहुल द्रविडने दिली होती.
  • स्मृतीच्या जर्सीचा नंबर आणि विराट कोहलीच्या जर्सीचा नंबर सारखाच आहे, १८.
  • स्मृती बिग बॅश लीग मध्ये ब्रिस्बेन हिटसोबत १ वर्षाचा करार करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. भारताची हरमनप्रीत कौर पहिली ठरली होती.
  • स्मृती वूमन्स सुपर लीग मध्येही वेस्टर्न स्टॉर्म ह्या संघाकडून खेळली आहे.
  • मॅथ्यू हिडन आणि कुमार संघाकराला स्मृती आदर्श मानते.

 

2,172 comments