भारताच्या मिसाईल प्रोजेक्टला जगात स्थान मिळवून देणारी अग्नीपुत्री…

 

भारत चीन वादावर मिडीयात चांगल्याचं चर्चा झडत आहेत. चीनकडं कोणती क्षेपणास्त्र आहेत. तो किती संरक्षणाच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे, अशाही चर्चा घडतायेत. परंतु भारतानेही आपल्या मिसाईल तंत्रज्ञानाला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. जागतिक दर्जाचं मिसाईल तंत्रज्ञान भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलं आहे. यात अब्दुल कलामांचं नाव सगळ्यांना माहित असतं. पण एक महिला जीने क्षेपणास्त्र निर्मिती भारताची धुरा संभाळली त्यांचं नावं म्हणजे टेसी थॉमस.  टेसी थॉमस यांच्याच शब्दात सांगायचं तर त्या आयएएस होऊ शकला असत्या, त्यांनी त्यासाठी परीक्षाही दिली होती पण सरंक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (DRDO) मुलाखतीसाठी बोलावणं आलं आणि लगेच कामाला सुरुवात झाली.

 

क्षेपणास्त्र निर्मिती क्षेत्रात स्त्रियांचं अत्यल्प प्रमाण अडलेल्या काळात टेसी थॉमस यांचं भारतीय क्षेपणास्त्र प्रकल्पाचं प्रमुख होऊन स्त्रियांचं या क्षेत्रातील कामही दर्जेदारच आहे हे पुरूषप्रधान भारताला दाखवून दिलं.

 

केरळमधील अलापूझा या निसर्गसौंदर्याने नटलेल्या सुंदर गावात टेसी थॉमस यांचा जन्म झाला. टेसींचे वडील आयएफएस अधिकारी होते. गावापासून जवळच असलेल्या तुंबा रॉकेट लाँचिंग सेंटर मुळे त्यांना लहानपणापासूनच या क्षेत्राबद्दल आकर्षण होतं. तेव्हापासूनच वैज्ञानिक संशोधनाबद्दल आवड मनात निर्माण झाली आणि त्यांनी अभ्यास सुरू केला.

 

थ्रीसुर महाविद्यालयात अभियांत्रिकी पदवी मिळवल्यानंतर त्या पुण्यातील शस्त्रास्त्र तंत्रज्ञान संस्थेत (Institute of Armament Technology) पदव्युत्तर शिक्षणासाठी दाखल झाल्या. गाईडेड मिसईल टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शस्त्रक्रिया व्यवस्थापनात एमबीए पूर्ण केलं आणि क्षेपणास्त्र मार्गदर्शनात पीएचडी मिळवली.

 

१९८८ मध्ये सरंक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये (DRDO) काम सुरू केल्यानंतर त्यांनी क्षेपणास्त्र क्षेत्रांतील अनेक महत्वाच्या प्रकल्पांवर काम केलं परंतू त्यांना विशेष ओळख मिळवून दिली अग्नी-V या क्षेपणास्त्राच्या यशस्वी उड्डाणाने. ओडिशामधून २०१२ मध्ये अग्नी-V ने उड्डाण घेतलं आणि या प्रकल्पात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या टेसी थॉमस यांना अग्निपुत्री हा बहुमान मिळवून दिला. टेसींचे आदर्श असलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांनीच टेसींची या मोहिमेसाठी निवड केली होती.

 

अग्नी-V बद्दल सांगताना टेसी म्हणतात, हे उड्डाण यशस्वीरित्या झालं असलं तरीही यासाठी अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. २००६ ला अग्नी-V चं उड्डाण यशस्वी न होऊ शकल्यामुळे अनेकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. २००६ च्या या अपयशानंतर टेसी दिवसाचे १४ ते १६ तास काम करत असायच्या.

 

प्रचंड मेहनतीनंतर २०१२ मध्ये यशस्वी झालेल्या मोहिमेमुळे भारतीय महिलांना क्षेपणास्त्र निर्मितीत टेसींच्या रुपात आदर्श मिळाला हेच खरं.

 

टेसी थॉमस यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे :

  • २०१८ चा डीआरडीओ चा सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक पुरस्कार.
  • २०११- १२ मधील सर्वोत्तम कामगिरी साठी डिआरडीओ चा पुरस्कार.
  • इंडिया टुडे समूहाचा २००९ साली सर्वोत्तम महिला पूरस्कार.
  • लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार.

 

1,893 comments