महात्मा गांधींना मिकी माऊस म्हणणारी कवयित्री.

 

सरोजिनी नायडूंचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान आपल्याला माहीत आहेच. पण त्यासोबतच त्या उत्तम लेखिका, कवयित्री आणि वक्त्या होत्या.

सरोजिनी नायडूंचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ ला हैदराबाद मध्ये झाला. त्यांचे वडील अघोरनाथ चट्टोपद्ध्याय वैज्ञानिक होते. त्यांनी हैद्राबाद मध्ये निझाम महाविद्यालय सुरू केलं होतं. सरोजिनी नायडूंची आई बारदा सुंदरी देवी नामांकित बंगाली कवियत्री होत्या. 

वयाच्या बाराव्या वर्षी सरोजिनी नायडू मॅट्रिक च्या परीक्षेत मद्रास महाविद्यालयात पहिल्या आल्या होत्या. पुढे वयाच्या सोळाव्या वर्षी निझामाकडून शिष्यवृत्ती मिळवून त्या सुरुवातीला लंडनमधील किंग्स कॉलेज मध्ये शिक्षणासाठी गेल्या आणि त्यानंतर केम्ब्रिज मधल्या गिर्टाँन कॉलेजमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केलं. 

सरोजिनी नायडूंना कवितेबद्दल प्रचंड प्रेम होतं. त्यांच्या महेर मुनिरह्या पर्शियन नाटकाचं हैदराबादच्या निझामाने देखील कौतुक केलं होतं. त्यांच्या साध्या सोप्प्या भाषेतल्या कविता बघितल्यानंतर वडीलांनाही त्यांना कवितेसाठी प्रोत्साहन दिलं. १३०० ओळींची ‘लेडी ऑफ द लेक’ ही दीर्घ कविता लिहिल्यानंतर मात्र साहित्य जगतातही त्यांचं नाव झालं.

लंडन मध्ये शिकत असताना सरोजिनींची भेट व्यवसायाने डॉक्टर असलेल्या गोविंदराजुलू नायडूंशी झाली. पुढे मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सरोजिनी ब्राम्हण समाजातील होत्या पण गोविंदराजुलू ब्राम्हण नव्हते. आंतरजातीय विवाहास समाजात मान्यता नसण्याचा काळात सरोजिनींच्या कुटुंबाने लग्नाला परवानगी देणं त्याकाळातील सामाजिक दृष्ट्या विचार करता सोपा निर्णय नव्हता. अघोरनाथ चट्टोपद्ध्याय पुरोगामी विचारसरणीचे पुरस्कर्ते असल्याने हा विवाह होऊ शकला.

 

सरोजिनी नायडूंचा १९०५ मध्ये झालेल्या बंगालच्या फाळणीनंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्रवेश झाला. गोपाळ कृष्ण गोखल्यांनी सरोजिनी नायडूंच्या कविता वाचलेल्या होत्या. त्यांनी सरोजिनींना लोकांमध्ये देशभक्ती जागवण्यासाठी कवितांचा उपयोग करण्याचा सल्ला दिला.

 

छोडो भारत आंदोलन आणि संविनय कायदेभंग आंदोलनात सरोजिनी नायडूंचं मोठं योगदान होतं. १९२५ मध्ये सरोजिनी नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या महिला अध्यक्षा झाल्या. १९३० मध्ये गांधीजी तुरुंगात असताना संविनय कायदेभंग आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली. १९३१ मध्ये झालेल्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधींसोबत सरोजिनीही सहभागी होत्या. गोलमेज परिषदेत त्यांनी भारतीय महिलांची स्थिती मांडली होती.

महात्मा गांधी आणि सरोजिनी नायडूंची भेट सर्वप्रथम लंडन मधील एक कार्यक्रमात झाली होती. त्यानंतरच त्यांचा भारतीय राजकारणाशी मोठ्या प्रमाणात संबंध यायला सुरुवात झाली. महात्मा गांधी सरोजीनींना बुलबुलतर सरोजिनी नायडू महात्मा गांधींना ‘मिकी माऊस’ आणि ‘लिटल मॅन’ म्हणत असल्याचे संदर्भ त्यांच्या पत्रात पाहायला मिळतात.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या पाहिल्या महिला गव्हर्नर होण्याचा मान सरोजिनी नायडूंना मिळाला.