ही आहे भारताची पहिली महिला फायटर प्लेन पायलट. 

१९ फेब्रुवारी २०१८ ला मिग-२१ बायसन’ ह्या लढाऊ विमानाने गुजरातमधील जामनगर हवाई तळावरून उड्डाण घेतलं खरं पण एक गोष्ट नेहमीपेक्षा वेगळी होती. नेहमी प्रमाणे लढाऊ विमान उडवणारा वैमानिक पुरुष नव्हता. पहिल्यांदा एक स्त्री लढाऊ विमान उडवत आकाशात झेपावत होती. ती होती फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी. मिग-२१ बायसन हे सर्वात जलद टेक ऑफ आणि लँडिंग करणारं लढाऊ विमान उडवण्याची मोहीम फत्ते करून भारतातील पहिली फायटर जेट पायलट बनण्याचा मान अवनी चतुर्वेदीने मिळवला.

 

अवनी मुळची माध्यप्रदेशातल्या शहडोल इथली. शाळेपर्यंतच शिक्षण शहडोललाच घेऊन पुढच्या शिक्षणासाठी अवनी राजस्थान मधील वनस्थली विद्यापीठातुन इंजिनिअरिंग करण्यासाठी रवाना झाली. वनस्थली विद्यापीठातून बी-टेक पूर्ण करून अवनीने फायटर पायलट बनण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

 

अवनीचे वडील प्रसाद चतुर्वेदीही इंजिनियर आहेत. अवनीला लहानपणापासूनच वैमानिक बनण्याचं स्वप्न असल्याचं तिच्या आईने माध्यमांना सांगितलं आहे. अवनी तिसऱ्या इयत्तेत असताना कल्पना चावलाच्या अंतराळ यान अपघाताची बातमी अवनीने बघितल्यापासून अवनीला हवाई क्षेत्रात काहीतरी करायची जिद्द होती असंही अवणीची आई सांगते.

 

कल्पना चावला बरोबरच भारताचे माजी राष्ट्रपती आणि अवकाश शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे ही अवनीचे आदर्श होते.

 

२०१६ मध्ये अवनी सोबतच मोहना सिंग आणि भावना कांत यांचीही ह्या कामासाठी निवड झाली होती. तिघींनाही लढाऊ विमान उडवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं पण पहिली लढाऊ वैमानिक बनण्याचा मान अवनी चतुर्वेदीला मिळाला. २०१६ च्या आधी भारतीय वायू सैन्यात महिलांना लढाऊ विमान उडवण्याची परवानगी नव्हती.

अवनीने घेतलेली ही झेप फक्त तिच्या एकटीची नाहीये. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्या सगळ्या स्त्रिया आणि पुरुषांसाठीही अवनीची ही झेप प्रेरणादायी ठरेल आणि तमाम स्त्रीयांना अशी उत्तुंग झेप घ्यायला प्रवृत्त करेल.