कामचुकार ग्रामसेवकाला असं लावा कामाला
महत्त्वाची कागदपत्रे काढण्यासाठी ग्रामसेवकांकडून अनेक दाखले लागतात. सैन्य भर्तीपासून कॉलेज अॅडमिशनपर्यंतचे दाखले काढण्यासाठी अनेकदा ग्रामपंचायत कार्यालयाच्या येरझाऱ्या मारयला लागतात. तुम्ही गेलाय आणि ग्रामसेवक कार्यालायत उपस्थीत आहे असं खुप कमी वेळा घडलं असेल. ग्रामसेवकाचं कामं नेमकं असतातं तरी काय? हा सवाल तुमच्या मनात येत असेल.
गावच्या विकासात सरपंच आणि सदस्य बॉडी इतकचं ग्रामसेवकाचं योगदान महत्त्वाचे असते. गावच्या सेवेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर गावचा चेहरा मोहरा बदलू शकतो पण अनेक ग्रामसेवक कार्यालयात उपस्थीत नसतात.
कामात कसूर करणाऱ्या या अधिकाऱ्याची कामं नेमकी कोणती आणि ती न केल्यास कोणाकडे तक्रार करुन त्यांच्यावर कारावाई करता येईल त्याची ही माहिती.
ग्रामसेवकाची कामे
१. ग्रामपंचायतींचे दप्तर सांभाळणे.
– ग्रामपंचायतीशी संबंधीत महत्त्वाची कागदपत्रे, ठराव, इत्यादी सांभाळण्याची जबाबदारी त्याची असते. तसेच कागदपत्र हरवू नयेत याचीही त्याला काळजी घ्यावी लागते.
२. ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्र तयार करणे
– जिल्हा परिषद व थेट राज्य व केंद्र सरकारकडून दरवर्षी गावच्या विकासकामांसाठी येणारा निधी कुठं, कसा, किती खर्च करायचा याचं नियोजन करणे.
३. शासकीय योजनांची माहिती देणे
केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देवून. लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे.
४. घरपट्टी, पाणीपट्टी इत्यादींची कर वसूली करणे, उतारे दाखले इत्यादी कागद पत्रांची प्रती देणे.
५. शैक्षणिक सुविधांचा आढावा घेणे
ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलभूत सुविधा ही नसतात. अशावेळी शिक्षण अधिक सुलभ आणि सोईचे कसे करता येईल यासाठी प्रयत्न करणे.
६. जन्म, मृत्यू, उपजतमृत्यू, विवाह इत्यादींची नोंद ठेवणे
७. जैव विविधता समितीचे, आपत्कालीन समितीचे, ग्रामसभेचे सचिव म्हणून काम पाहणे.
काम चुकार ग्रामसेवकांवर कशी कराल कारवाई
गावकऱ्यांना कायद्याचं आणि यंत्रणेचं ज्ञान नसल्याने त्यांचे फावते. कामात अनियमितता आणि ग्रामविकासात आडकाठी आणणाऱ्या ग्रामसेवकांविरुद्ध गट विकास अधिकारी (BDO) किंवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार करता येते.
कामचुकार ग्रामसेवकांवर निलंबणाची कारवाई या अधिकाऱ्याकडून होवू शकते.