पीककर्ज काढताय ? वाचा हा लेख !

पीककर्ज काढायचंय, पण कसं काढतात माहीत नाही. बँकांमध्ये आणि इतर सरकारी ऑफिस मध्ये चकरा माराव्या लागतात म्हणून कर्ज काढायचं थांबला आहात ? तसं असेल तर जास्त टेंशन घेऊच नका दादा… हा लेख तुमच्यासाठीच आहे. वाचा आणि जाणून घ्या नक्की कर्ज काढण्याची प्रक्रिया नक्की असते तरी कशी ?

सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळतं. पण त्यासाठी शेतकरी त्या बँकेचा खातेदार असणं गरजेचं असतं. जे शेतकरी आधीपासूनच बँकेचे खातेदार असतात त्यांना पीक कर्जासाठी थेट अर्ज करता येतो.

पीक कर्जासाठी आपल्याकडे काही कागदपत्र असणं गरजेचं असतं. ही कागदपत्र आपल्याला तलाठ्याकडून मिळतात. ही कागदपत्र नक्की कोणती ?  सांगतो ना भाऊ… पीक कर्जासाठी शेतकर्‍याकडे ‘नमुना 8अ ‘ उतारा आणि सात-बाराचा उतारा असणं गरजेचं असतं. याआधी कुठल्याही सोसायटीचं कर्ज नसलेला दाखला आणि आपण राहतो त्या परिसरातील  कुठल्याही बँकेचं कर्ज नसल्याचं प्रमाणपत्र गरजेचं आहे. एक लाखापर्यंत कर्ज असल्यास इतकी कागदपत्र लय झाली. पण अजून जास्त कर्ज काढायचं असेल तर थोडी जास्त कागदपत्र काढावी लागतात.

एक लाखापेक्षा जास्त कर्ज काढण्यासाथी तुमच्याकडे शेतीचा नकाशा असणं गरजेचं आहे. त्याबरोबरच इतर बँकेचं कर्जा नासल्याचं प्रमाणपत्र, ओलीताचं प्रमाणपत्र, चतु:सीमा प्रमाणपत्र आणि कृषी उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं असतं.

आता ही कागदपत्र काढण्यासाठी जास्त टेंशन घ्यायची गरज नाही भाऊ ! तलाठ्याकडे जायचं आणि ही कागदपत्र एक रूपयाही न देता काढून घ्यायची. शेतीचा खर्च प्रत्येकवर्षी काय सारखा नसतो, महागाई वाढत जाते. बियाणे महाग होतात. त्यामुळे शेतीचा खर्च वाढत जातो. त्यामुळं दरवर्षी 20 टक्के वाढीव पीक कर्ज मिळतं.

कागदपत्र मिळवून, बँकेत कर्जाचं प्रकरण करून , सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आठवड्याभरातच कर्ज मंजूर होतं म्हणून जर कर्ज काढायच्या विचारात असाल तर लगेच सगळी कागदपत्र मिळवा आणि कर्जासाठी प्रकरण करून टाका !