दिवस-दिवस कानात इयरफोन्स टाकून गाणी ऐकताय ? थांबा, त्याआधी हे वाचा…

 

अन्न, वस्त्र, निवार्‍यासोबत दिवसेंदिवस आपल्या मूलभूत गरजा वाढत चालल्यायेत. मुलभूत गरजांमध्ये आता मोबाइल, इंटरनेट आणि हेडफोन्सचं नाव जोडलं तरी काही चूक ठरणार नाही. पण जर दिवस-दिवसभर कानात इयरफोन्स टाकून जर बसत असाल तर जरा जपून ! कारण तुमच्या आरोग्यासाठी हे त्रासदायक ठरू शकतं, आणि कानाच्या अनेक समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं.

 

डॉक्टरांच्या मते आपल्या कानात जाणारे अनावश्यक आवाज पडद्यावर आदळतात आणि परत येतात, पण इयरफोन्स वापरताना गेलेले अनावश्यक आवाज इयरफोन्स मुळे बाहेर पडू शकत नाहीत.

आवश्यक आणि अनावश्यक आवाज एकत्रित पणे कानाच्या पडद्यावर आदळल्याने कानाच्या नसांचा त्रास सुरू होतो आणि नसा कमकुवत होण्याच्या शक्यता वाढतात.

 

इयरफोन्सच्या इतरही तोटयांकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. गाडी चालवताना इयरफोन कानात टाकून गाणी ऐकत प्रवास करण्याची सवय आपल्यापैकी अनेकांना असते. ती सवय आपल्यासाठी धोक्याची ठरू शकते.  गाडी चालवताना आपलं लक्ष एकाच ठिकाणी असणं गरजेचं असतं. कानात इयरफोन टाकलेले असल्यामुळे अनेकदा आपलं लक्ष आपण ऐकत असलेल्या गोष्टीकडे केंद्रीत होतं, शिवाय आपल्याला इतर गाड्यांच्या हॉर्नचा आवाज ऐकू येत नाही. या सगळ्या प्रकारामुळे अपघात होण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं.

 

इयरफोनच्या वापरामुळे हीयरिंग लॉस म्हणजे ऐकू न येण्याचे आजार होऊ शकतात. जगातल्या  25 ते 30 टक्के लोकांना हे आजार व्हायला लागले आहेत.

 

पण भाईलोग लगेच घाबरून जाण्याचं काही कारण नाही. थोड्याफार प्रमाणात इयरफोन्स वापरल्याने तुम्हाला लगेच असा काही आजार होणार नाही. आता इयरफोन्स न लावता पिक्चर बघणं किंवा गाणी ऐकल्याशिवाय दिवस पूर्ण झाल्यासारखं कसं वाटंल ? त्यामुळं लगेच घाबरून जाऊन इयरफोन फेकून द्यायची गरज नाही, पण कसं प्रमाणात वापरता येतील याकडं लक्ष देणं गरजेचयं.

 

बाकी आता लगेच टेंशन घेऊन कानातले नको काढू भावड्या, लाव गाणं! आवाज वाढव डिजे तूला आयची शपथ हाय…