“सुपारी बागेला’ महाजनांनी ‘अडकित्ता’ लावला अन उत्तर महाराष्ट्राचं राजकारणच बदललं…

 

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पारंपारिक राजकारणाला डावलत अचानक एक नाव उत्तर महाराष्ट्रातून पुढे आलं, गिरीश महाजन !

 

आजपर्यंत सहा वेळा जामनेर मतदारसंघातून निवडून आलेल्या गिरीश महाजनांच्या राजकारणाची सुरुवात अगदी छोट्या स्तरावरून झाली. कॉलेजमध्ये असल्यापासूनच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडले गेले होते. अ.भ.वि.प. मुळे भाजपच्या राजकरणाशी त्यांचा जवळून संबंध आला.

 

1988 ते 1990 या दोन वर्षांच्या काळात महाजन भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. पुढे 1992 मध्ये त्यांनी जामनेर ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. जामनेरचे सरपंचही महाजन झाले होते.

 

जामनेरच्या राजकरणात त्यावेळी दोन गट महत्वाचे होते. सुपारी बाग आणि बाकडा गट. जळगावातील मोहन धारीवाल यांच्या दुकानाबाहेरच्या बाकड्यावर त्यावेळचे आमदार ईश्वरलाल जैन यांच्या विरोधकांचा ग्रुप जमायचा त्याला बाकडा गट म्हणायचे तर आमदार ईश्वरलाल जैन यांच्या जामनेर मधल्या बंगल्याचं नाव सुपारी बाग होतं. ईश्वरलाल समर्थकांना सुपारी बाग गट म्हणून ओळखलं जायचं.  या दोन गटांच्या अवतीभोवतीच जामनेरचं राजकारण होतं. त्यामुळे या राजकरणात उतरण्यासाठी सुपरीबागेच्या विरोधकांची मदत घेणं महाजनांना गरजेचं होतं. बाकडा गटाने आणि सुरेश जैन यांनी महाजनांना विधानसभेसाठी मदत करण्याचं ठरवलं आणि 1995 ची विधानसभा निवडणूक जिंकून महाजनांनी सुपारीबागेला अडकित्ता लावला. इंटरेस्टिंग गोष्ट अशी की गिरीश महाजनांनी त्यांच्या बंगल्याचं नावही नंतर ‘अडकित्ता बाग’ ठेवलं होतं.

 

1995 नंतर 1999 च्या निवडणुकीतही महाजनांनी इश्वरलाल जैन यांचा मोठा पराभव केला होता. नंतर आजपर्यंत ते जामनेर मतदार संघातून कधी पडलेच नाहीत, पण 2009 ची निवडणूक महाजनांना थोडी अवघड गेली. महाजनांच्या विरोधात उभ्या असलेल्या कोंग्रेसचे उमेदवार संजय गरुड यांनी सोनिया गांधींना जामनेर मध्ये प्रचारासाठी आणलं. शिवाय मराठा समाजाचाही बर्‍यापैकी पाठिंबा गरुडांना मिळाला. महाजनांच्या आणि गरुडांच्या मतांमध्ये फक्त 7 हजारांचा फरक असला तरीही महाजनांनी विजय मिळवून पुन्हा मतदारसंघ बांधला आणि 2019 ला सहाव्यांदा जामनेरचे आमदार म्हणून निवडून आले.

 

महाजनांच्या राजकारनाचा पाया म्हणजे त्यांचा डायरेक्ट सामान्य लोकांशी असलेला संपर्क. लग्न-कार्य, मिरवनुकांमध्ये महाजन फक्त सहभागीच होत नाहीत तर डिजे वर ताल धरताना पण दिसतात. सुरुवातीच्या काळात महाजन मतदार संघात मोटरसायकलने फिरायचे. पारावार, चहाच्या टपर्‍यांवर गप्पा मारत महाजनांचा लोकांशी संपर्क वाढत गेला. त्यामुळेच मराठा बहुल मतदारसंघात महाजन निवडून येऊ शकले.

 

उत्तर महाराष्ट्रातल्या राजकारणात वेगळं अस्तित्व निर्माण केलेल्या महाजनांशिवाय भाजपचं उत्तर महाराष्ट्रात पानही हलत नाही.

2019 च्या निवडणुकीत 47 मतदारसंघाची जबाबदारी महाजनांवर भाजपने टाकली होती.

 

2019 च्या निवडणुकीत भाजपने एकनाथ खडसेंना भाजपने तिकीट न दिल्याने आणि निवडणुकीत रोहिणी खडसें पडल्यानंतर, खडसेंनी गिरीश महाजनांवर टीका केली होती. त्यानंतर महाजन आणि खडसेंमधला वाद चव्हाट्यावर आला होता.  पक्षाच्या विरोधात कोणतही काम केलेलं नाही सांगून जर खडसेंनी पुरावे दिले तर पक्ष देईल ती शिक्षा स्वीकारेण असं त्यावेळी महाजन म्हणाले होते.

 

महाजनांवर कितीही टीका झाली, तरीही उत्तर महाराष्ट्राच्या भाजपला आता गिरीश महाजनांशिवाय पर्याय उरलेला नाही, असं राजकीय विश्लेषक सांगतात.