रेडीओचा शोध, इटलीच्या मार्कोनीने नाही तर भारताच्या जगदीशचंद्र बोसांनी लावला होता.

लहानपणी शाळत विज्ञानाच्या तासाला सजीव निर्जीव शिकलेलं तुम्हाला आठवत असेल. वनस्पती सजीव असतात हे ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य झालं होतं ना? तो शोध लावला होता जगदीशचंद्र बोस यांनी. म्हणजे हाच तो माणूस ज्यांच्यामुळं मंसाहार करणाऱ्यांना टोमणे मारणाऱ्या शाकाहारी मित्रांना उत्तर मिळालं. “तुम्ही फळभाजा खाता त्यातही जीव असतोच ना.”

 

३० नोव्हेंबर १८५८ला जन्मलेल्या जगदीशचंद्र बोसांच्या नावावर एक मोठा ऐतहासिक वाद आहे. रेडीओच्या शोधाचा. रेडीओचा शोध इटलीतील ‘मार्कोनी’ या शास्त्रज्ञानं लावला असल्याचं आपल्याला माहिती आहेच. या शोधासाठी त्यांना १९०९ला नोबेल पुरस्कारही  देण्यात आला. पण मार्कोनीच्या आधी जगदीश चंद्र बोसांनी हा शोध लावला होता. काही कागदपत्रांच्या अभावामुळं त्यांच्या नावे हा शोध झाला नाही. आणि त्याला कारणीभूत होती त्यांची डायरी.

ही गोष्टय १८९६-९७ची. बोस आणि मार्कोनी दोघे लंडनमध्ये होते. मार्कोनी ब्रिटीश अधिकाऱ्यांसाठी वायरलेस यंत्र बनवण्यात व्यस्त होते. तर बोस हे लंडनमध्ये अभ्यास दौऱ्यासाठी होते. मॅक्लर नावाच्या एका मॅगझिनमध्ये मार्च १८९७ला या दोन वैज्ञानिकांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोस यांनी मार्कोनींची स्तूती केली. विनातार संदेश वहनाच्या संशोधनात कोणताच रस नसल्याचही बोस म्हणाले होते.

नंतरच्या काळात १८९९मध्ये बोस यांनी ‘मर्क्यूरी कोहेनन विथ टेलीफोन डिटेक्टर’ या तंत्रज्ञानाला विकसीत केलं. ज्याचा उपयोग करुन रेडीओ सारखे यंत्र बनवणे शक्य होतं. याबद्दलचा एक रिसर्च पेपर बोस यांनी रॉयल सोसायटीमध्य प्रकाशित केला. पण त्यांनी या संशोधनाबद्दलची सर्व टिपणं ठेवलेली डायरी हरवली. तर दुसरी कडं मार्कोनी यांना या यंत्रातून होणाऱ्या आर्थिक फायद्याची पूर्ण कल्पना होती. बोस यांच्या रिसर्च पेपरातली तंत्रज्ञानाचा पूरपुर उपयोग करून मार्कोनी यांनी रेडीओ जगा समोर आणला. भरपूर पैसा, आदर आणि नोबेल कमावला. यावर आक्षेप घेत बोस यांनी पेटंटचा दावा केला पण अंतर्गत राजकारणामुळं युरोपातील शास्त्रज्ञांनी त्यांची दखल घेतली नाही आणि त्यामुळं जगदीशचंद्र बोसांच्या मेहनतीचं फळ काही त्यांना मिळालं नाही.

जगदिशचंद्र बोस असे झाले सर जगदीशचंद्र बोस

१० मे, १९०१ रोजी लंडन येथील रॉयल सोसायटीचे सभागृह वैज्ञानिकांच्या उपस्थितीने गच्च भरले होते. जगदीशचंद्र बोस तेथे आपल्या एका महत्त्वपूर्ण प्रयोगाचे प्रात्यक्षिक सादर करणार होते. त्यांनी वनस्पतींची संवेदनशीलता तपासणारे ‘क्रेस्कोग्राफ’ या नावाचे अतिशय नाजूक उपकरण बनवले होते. ते उपकरण म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असा शोध होता. एका रोपट्याला ते उपकरण जोडले होते. नंतर ते रोपटे ब्रोमाइड या विषारी द्रव्याच्या पसरट भांड्यात बुडवण्यात आले. त्यामुळे वनस्पतीच्या सूक्ष्म स्पंदनांचे प्रक्षेपण वर्धित स्वरूपात पडद्यावर दिसत होते. थोड्या वेळाने त्या रोपट्याचे स्पंदन अनियमित होत होत अचानक थांबले. रोपटे जणू काही विषाला बळी पडले होते. वातावरण आश्चर्याने स्तब्ध झाले होते.

क्रेस्कोग्राफ : वनस्पतींची वाढ नोंदवणारे व सूक्ष्मातीसूक्ष्म हालचाल कोट्यांशपटींनी वर्धित करून दाखवणारे नाजूक उपकरण. या प्रयोगामुळे वनस्पती शरीरक्रिया जाणणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांना मुळीच आनंद झाला नाही. बोस हे पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ असून, विज्ञानाच्या अन्य क्षेत्रांवर त्यांनी अतिक्रमण करण्याचे धाडस केले, हे त्या शास्त्रज्ञांच्या रागामागील व आनंदित न होण्यामागील कारण होते. वनस्पती शरीरक्रिया शास्त्रातील वैज्ञानिकांनी प्रतिपादित केलेल्या गोष्टी चूक असल्याचे बोस यांनी सिद्ध केले होते. सभागृहातील वैज्ञानिक यामुळे इतके विचलित व प्रक्षुब्ध झाले की, रॉयल सोसायटीतर्फे बोस यांचे भाषण प्रकाशित करण्यास त्यांनी विरोध केला. परंतु खोटा पडेल इतका आपला प्रयोग तकलादू नाही, याबद्दल बोस यांना आत्मविश्वास होता. दोन वर्षे अथक परिश्रम करून त्यांनी एक प्रबंध (मॉनोग्राफ – Monograph) प्रकाशित केला. प्रबंधाचे शीर्षक होते ‘सजीव व निर्जीव यांच्यातील प्रतिसाद प्रक्रिया’ (Response in the Living and Non-living). आपला प्रयोग अचूक असून प्रयोगाचे फलित योग्यच आहे, हे सत्य स्वीकारण्यास पर्याय नाही; हे रॉयल सोसायटीला त्यांनी पटवून दिले. जे भाषण सुरुवातीस प्रकाशित झाले नाही, ते आता प्रकाशित देले गेले व जगभर वितरित करण्यात आले. बोस यांची शास्त्रज्ञ म्हणून जगभर ख्याती पसरली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. इ.स. १९२० साली रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. या पदासाठी निवड झालेले ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरले. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे मोल लक्षात घेऊन ब्रिटिश शासनाने इ.स. १९१७ मध्ये त्यांना ‘सर’ या किताबाने सन्मानित केले. तेव्हापासून ते ‘सर जगदीशचंद्र बोस’ या नावाने ओळखले जाऊ लागले.

 

विज्ञानासोबतच जगदीशचंद्र बोस कलेचे चाहते होते. त्यांची साहित्यातही रुची होती. भारतातील सर्वश्रेष्ठ कवींपैकी एक रविंद्रनाथ टागोर यांच्याशी त्यांचे चांगेल संबंध होते. बोस यांनी सर्वप्रथम टागोरांचे साहित्य भाषांतरीत करुन ते प्रसिद्ध केले. त्यामुळे जगाला रविंद्रनाथ टागोरांच्या प्रतिभेचे दर्शन झाले. जगदिशचंद्र  बोस यांनी त्यांच्या मृत्यूच्या एकदिवस आधी बोस संशोधक संस्थेच्या निदेशकास सांगितले होते की माझी उरली सुरली संपत्ती विकून त्यातून मिळणाऱ्या पैशाचा धन संशोधनासाठी आणि समाजकारणासाठी उपयोग करावा. २३ नोव्हेंबर १९३७ला त्यांनी जगाचा निरोप घेतला.