एका फोटोने बदललं चहावाल्याचं आयुष्य…

“सडक से उठा के स्टार बना दुंगा” हा डायलॉग तुम्ही एकलाच असेल. आपण पण दोन पेग मारल्यावर हा डायलॉग मित्रांना लय वेळा चिटकवतो. अशाच एका माणसाची ही गोष्टय.

आता हा डायलॉग ऐकला म्हणजे तुम्हाला वाटलं असेल आम्ही तुम्हाला अनुराग कश्यप बद्दल सांगतोय नाहीतर नागराज मंजुळेबद्दल. पण तसं नाहीये भाईलोग.

तुम्हाला आठवतंय का, 2-4 वर्षापूर्वी एका मुलाचा फोटो खतरनाक व्हायरल झाला होता. निळ्या डोळ्याचा, आकाशी कुर्ता घातलेला, खतरनाक हँडसम मुलगा, त्याचा टपरीवर चहा बनवतानाचा फोटो पाहून जगभरातल्या पोरी तर येड्या झाल्या भावांनो… “उस रात अपण दो बजे तक पिया” असं म्हणायची वेळ सगळ्या पोरांवर आणली या भावाने… त्याचा किस्सा नक्की काय हे तुम्हाला आज सांगुनच टाकतो…

तर या भाऊंचं नाव आहे, अरशद खान, यांची पाकिस्तानात एक चहाची टपरी होती. एक दिवस तिथं चहा बनवत असताना जिया अली नावाची मुलगी आली. ती फक्त चहा पिऊन थांबली नाही. त्याच्याकडे बघून, तुम्हाला सांगतो शंभर टक्के ती विचारात पडली असेल.  आजच्या जगात गल्लीतला पप्प्या पण स्टार आहे हे तिला माहीत असेलच कदाचित, म्हणूनच एवढा हँडसम चेहरा चहा कसा विकतोय असा तिला प्रश्न पडला असावा.

तिने सरांना एक फोटो काढू देण्याची विनंती केली. सरांनी मान्य केली. नंतर त्या फोटोचं काय झालं ते आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. फोटो एवढा व्हायरल झाला, एवढा व्हायरल झाला, की विचारायची सोय नाही !

 

त्या फोटो नंतर भाऊंचं आयुष्यच बदललं. कोण म्हणे मॉडेलिंग कर, कोण म्हणे सिनेमात घेतो, कोण म्हणे आमचा अॅम्बॅसिडर हो… लय काय काय… रांगाच लागल्या.

अरशद भाऊ मॉडेलिंग करायला लागले. घरादाराचा नक्षाच बदलला. पैसा यायला लागला. पण भाऊंनी आता मॉडेलिंग आणि सिनेमा इंडस्ट्री सोडलीये. त्याचं कारण पण तसच झालं.

 

अरशद एका म्यूजिक व्हडिओ मध्ये एका महिलेसोबत दिसला. त्याच्या घरच्यांना हे काम काही आवडलं नाही. आपली नाराजी त्यांनी अरशदला सांगितली. आणि बास ! अरशद ने इंडस्ट्री सोडली. पण अरशद आतापर्यंत पाकीस्तानातला मोठा सेलिब्रेटी झालेला होता. अर्शद ने इस्लामाबाद मध्ये आता स्वतःचा कॅफे सुरू केलाय, कॅफे चायवाला नावानं.

तिथे जाणार्‍या लोकांना फक्त उत्कृष्ट चहाच मिळत नाही तर सेलिब्रिटी भाऊंसोबत सेल्फी पण मिळतो. काही लोक अर्शदच्या हातचा चहा पिण्याची मागणी करतात. त्यांना अरशद स्पेशल चहाही बनवून देतो.

 

रात्रीत स्टार झालेल्या अरशदला गरीब मुलांसाठी एक संस्था सुरू करायची आहे. जिथे फक्त मुलांना शिक्षणच मिळणार नाही, तर वेगवेगळे कौशल्य आणि कसब शिकवले जातील. अशी संस्था उभारण्यासाठी अरशदने कामही सुरू केलय.

आहे की नाही भाऊंची कहाणी एकदम फिल्मी…