महाराजा यशवंतराव होळकरांचं जन्मस्थान आजही दूर्लक्षित का ?

महाराष्ट्राच्या मातीला शौर्य आणि वीरतेचा मोठा वारसा आहे. याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला शूर आणि पराक्रमी राजा म्हणजे महाराज यशवंतराव होळकर.

पुण्यापासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाफगावला 1776 साली महाराज यशवंतराव होळकरांचा जन्म झाला. आज मात्र यशवंतराव होळकरांच्या जन्मस्थानाकडे कुणाचंही लक्ष नसल्याचं स्थानिक आणि इतिहासप्रेमींकडून सांगितलं जातं. सुभेदार मल्हारराव होळकरांना जुन्नर प्रांतातल्या वाफगावची जहागिरी मिळाल्यानंतर १७४९ च्या दरम्यान वाफगावला भुईकोट बांधण्यात आला होता. सुभेदार मल्हारराव होळकरांनी एकाच वेळी ६ ठिकाणी ६ भुईकोटांचं बांधकाम सुरु केलं होतं, त्या ६ पैकी वाफगावचा भुईकोट एक आहे

1797 ते 1811 दरम्यानचा काळ महाराज यशवंतराव होळकरांच्या शौर्याचा होता. त्यांनी इंग्रजांच्या नाकी नऊ आणले होते. यशवंतराव महाराजांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गव्हर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली होती.

अशा पराक्रमी राजाचं जन्मस्थान मात्र आज प्रचंड दुर्लक्षित असल्याचं स्थानिक सांगतात. वाफगावला यशवंतराव होळकरांचा वाडा आहे. वाफगावच्या भुईकोट किल्ल्यातल्या राणी महालात महाराज यशवंतराव होळकरांचा जन्म झाला. या भुईकोट किल्ल्यात मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर , तुकोजीराव होळकर, यशवंतराव होळकर(प्रथम) यांनी अनेक वेळा दक्षिण मोहिमांच्या दरम्यान मुक्काम केला आहे तसंच या किल्ल्यात पूर्वी होळकरांची टाकसाळही होती. हा किल्ला एकूण ८ एकर जागेत विस्तीर्ण असून या किल्ल्याच्या बांधकामात घडीव दगड व विटांचा उपयोग केला आहे.

एकेकाळी एवढं समृद्ध असलेल्या ठिकाणाकडे मात्र आज कुणाचंही लक्ष नाही असं अनेक इतिहासप्रेमींकडून समजतं.

कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाचा वसा हाती घेतला आणि रयत शिक्षण संस्था उभी केली. गावोगावी शाळा उभं करण्याचं ध्येय समोर ठेवलं. पण गावोगावी शाळा उभारण्याचा विचार उच्च असला तरीही सोप्पा नव्हता. यात कर्मवीर आण्णांची मदत केली महाराज यशवंतराव होळकर द्वितीय यांनी. आणि वाफगावच्या वाड्यात रयत शिक्षण संस्थेची शाळा सुरू झाली.

रयत शिक्षण संस्थेची त्यावेळची आर्थिक परिस्थिति चांगली नव्हती आणि यात महाराज यशवंतराव होळकरांनी जागा संस्थेला देऊन पुण्ण्याचंच काम केलं पण आता मात्र रयत शिक्षण संस्थेची आर्थिक स्थिति सुधारली आहे, त्यामुळे सरकारने शाळेसाठी दुसरी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जोर धरते आहे.

इतिहासाची, गड-किल्ल्यांविषयी आस्था आहे, असं सांगणाऱ्या सरकारनं वाफगावचा किल्ला संरक्षित करावा. त्याची डागडुजी करावी. महाराजा यशवंतराव होळकर यांचा सिंहासनाधिष्टीत पुतळा बसवावा. त्यावर मेघडंबरी बसवावी. अशी मागणी समाजातून केली जातेय.

यशवंतराव होळकरांच्या वाड्याच्या आणि भुईकोट किल्ल्याच्या डागडुजीसाठीही अनेकांनी वारंवार प्रशासनाकडे मागणी केल्याचं सांगण्यात येतं.  यावर आता नक्की काय मार्ग निघतो, सरकार काय निर्णय घेतं  हे येणारा काळच ठरवेल.