राष्ट्राध्यक्षाला नडणारा टेलिग्रामचा संस्थापक, पावेल दुरोव !

आजच्या काळात सोशल मिडीयाचं वाढलेलं महत्व आपल्याला सर्वांनाच माहित आहे.  फेसबुक, ट्विटर इंस्टाग्रामची जिकडे तिकडे हवा आहे. आजच्या पिढीतला कुणी हे सोशल मिडिया अॅप्स वापरत नाही असा क्वचितच कुणी सापडेल. अशात अजून एका अॅपची चांगलीच हवा आहे. ते म्हणजे टेलिग्राम. पण ही नुसती हवा नाही. या टेलिग्रामचा मालक रशियाच्या राष्ट्राध्यक्षाशी पंगा घेत एकटा सगळीकडे नडतोय. भावात खतरनाक हिम्मत आहे.  त्याचीच ही गोष्ट.

भावाचं नाव आहे पावेल दुरेव. याचा जन्म  १९८४ला सोवियत रशियातल्या लेनिनग्राड शहरात झाला. आता लेनिनग्राड शहराचं नाव बदलून सेंट पिटर्सबर्ग झालंय. ते नाव का बदललं यावर दूसरं एक स्वतंत्र आर्टिकल आम्ही तुमच्यासाठी लिहू. आता पुन्हा मूळ मुद्द्यावर येऊ.

दुरेव भाऊंचा जन्म लेनिनग्राड मध्ये झाला असला तरीही त्यांचं लहानपण इटलीत गेलं. असं म्हणतात की शाळेत असतांना भाऊंनी शाळेतलं कॉम्प्युटरच हॅक केलं होतं. तेव्हाच बाळाचे पाय पहिल्यांदा पाळण्यात दिसले.

इटलीहून पुन्हा मायदेशी रशियात परत आल्यानंतर दुरेव भाऊंनी सेंट पिटर्सबर्ग  युनिवर्सिटीत प्रवेश घेतला. पण त्यांचा विषय होता भाषा विज्ञान. 2006 मध्ये शेठने हे ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. पण असं म्हणतात की त्याचं डिग्री सर्टिफिकेट आजपर्यंत कॉलेजमधून भाऊंनी घेतलेलं नाही.

युनिवर्सिटीतून बाहेर पडल्यानंतर पावेल दुरेवने सोशल मिडिया नेटवर्क व्ही कॉन्टॅक्टे  म्हणजेच व्हीके सुरू केलं.  सुरुवातीला व्हीके फेसबुकचं रशियन वर्जन असल्यासारखं वाटायचं. म्हणून दुरेव भाऊंना रशियाचा मार्क झुकरबर्ग म्हटलं जातं. भाऊ इथंच थांबले नाहीत. त्यांनी टेलीग्राम हे मेसेंजर अॅप सुरू केलं. याच काळात मार्क झुकरबर्गने व्हाट्सअॅप विकत घेतलं होतं.

व्हीके खूप कमी काळात लोकप्रिय झालं आणि पर्यायानं दुरेव भाऊ पण.  या सगळ्यात पण भाऊ खतरनाक नडलेत. म्हणजे अगदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनासुद्धा !

त्याचं झालं काय, पुतीन यांनी 2011 मध्ये संविधानात बदल करून तिसर्‍यांदा स्वतःला राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. या विरोधात खूप मोठी आंदोलनं होऊ लागली होती. या आंदोलनात जनजागृतीसाठी आणि एकत्र येण्यासाठी व्हीके चा मोठ्या प्रमाणात वापर झाला. रशियन प्रशासनाने पुतीन यांच्या सर्व विरोधकांना व्हीके वर बंदी घालावी  असं सांगितलं. आता दुरेव भाऊ काय साधे नव्हते, तरुण, तडफदार, उसळतं रक्त होतं  त्यांचं. ट्विटर आणि व्हीके वर दुरेव भाऊंनी दोन फोटो टाकले. एका फोटोत जीभ दाखवणारा कुत्रा होता आणि दुसर्‍यात स्वतः दुरेव भाऊ मधलं बोट दाखवत होते. आता याचा अर्थ काय होतो ते आम्हाला काय माहीत नाही ब्वॉ… पण पुतीन चिडले होते हे मात्र खरं…

त्यानंतर पुतीन यांनी चांगलाच बदला घेतला. पुतीन यांच्या सहकार्‍यांनी सुमडीत मोठ्या प्रमाणात व्हीके मधले शेअर्स विकत घेतले त्यानंतर मात्र पावेल दुरेवला रशिया सोडावं लागलं.

ज्यावेळी पुतीन आणि दूरेवचं वाजलं होतं त्यावेळी SWAT ची टिम दुरेवच्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचली होती. तेव्हा आपल्या भावाला मेसेज करताना दुरेवला जाणवलं की आपल्याकडे सुरक्षित संदेशवहन म्हणजे Secured Mess eging करण्यासाठी कोणतच मेसेंजर नाही, आणि याच विचारातून जन्माला आलं टेलिग्राम मेसेंजर. आज जगात मोठ्या प्रमाणात टेलिग्राम मेसेंजर वापरलं जातं आणि ते इतर मेसेंजरपेक्षा खूप सुरक्षित असल्याचंही म्हटलं जातं.

पण हे सुरक्षित असल्याचे काही तोटेही आहेत. काही दहशतवादी संघटना या टेलिग्रामचा वापर करतात असं म्हटलं जातं. यावरून पुतीन यांनी मुद्दा उचलला होता. टेलिग्रामचा अॅक्सेस बंद करण्याचा प्रयत्नही रशिया सरकारकडून करण्यात आला होता, पण स्वतः रशियातले मोठमोठे लष्करी अधिकारीही सुरक्षित असल्यामुळे टेलिग्राम वापरतात ही यातली विनोदी गोष्ट.

टेलिग्रामचा लोगो कागदी विमान आहे. 2012 मध्ये व्हीकेच्या सेंट पिटर्सबर्गच्या मुख्यालयाच्या खिडकीतून चाहत्यांसाठी पैसे खाली फेकले होते. नोटांचं विमान करून हे पैसे फेकण्यात आले होते. यातूनच प्रेरित कागदी विमान हा टेलिग्रामचा लोगो आहे.

पुतीन यांना कपडे काढून फोटो काढायला आवडतात. त्याची खिल्ली उडवायला दुरेव भाऊ पण तसे  फोटो काढून सोशल मिडियावर टाकत असतात.

दोघांमधील खुन्नस अजूनही तशीच आहे. पुतीन जरी राष्ट्राध्यक्ष असले तरीही पावेल भाऊ दुरेवबी नडायला मागं पुढं पहात नाहीत.