नाद करावा तर कोल्हापूरकरांनीच, शाहू छत्रपतींनी शिकारीसाठी आफ्रिकेतून आणले होते चित्ते

 

महाराष्ट्रात नवाबी शौक कुणी करावं तर कोल्हापूरकरांनीच इतरांचा त्यो घास बी नाय.  तांबडी माती ते तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूरकरांचा स्वॅग सांगतो. ऱ्हायाला, खायाला आणि फिरायला बेश्ट सिटी मंजे कोल्हापूर. ते सगळं ठिकाय पण शिकारीसाठी कोल्हापूरकर चित्ता पाळायचे. ऑ… कायतर सांगालाय असं म्हणून नगा. आपण ढलप्या मारत न्हाई. चला तर मंग शिकारीच्या चित्त्याची गोष्ट सांगतो.

झालं असं की

शाहू महाराजांनी भावसिंग महाराजांच्या हिकड असताना चित्त्याकडन शिकार करवून घेण्याचा विषय त्यांनी बगितला. आणि आपल्या शिकार खान्यात बी असं चित्त असावत असा इचार त्यांनी पक्का केला. ठरलं तर मग शाहू महाराज परत कोल्हापूरला आल्यावर शिकर खान्यातल्या लोकांना आफ्रिकेला पाठवलं.

व्हय पण चित्त्यासनी पाळत कसं हुते

कोल्हापूरकर आफ्रिकेत गेलं चित्त घेवून आलं. येताना बी निस्ती धाकधुक. चित्ता जर निसटलं बिसटलां तर… असं बी त्यांच्या मनात यायचं. आणि एक दोन चित्तं न्हवत ओ. ३५ चित्त घिवून हे

आजवर शिकारीसाठी कुत्री वापरली जायची आणि शाहू महाराजांनी डायरेक्ट चित्तच आणलं. कोल्हापूरात चित्त आलं आणि कोल्हापूरकर चित्ता बघायला कदी मिळणार ह्याची वाट बघायला लागले.

हे पारावर चर्चा व्हायच्या. “जायाचं का शिकार बगायला.” एक जण म्हणायचा. तर दुसरा म्हणायचा. “ते खराय पण बघणाऱ्याची शिकार हू नयं मंजे झालं.” लोकांच्या मनात शंका हूतीच म्हणा पण, शाहू महाराजांनी चित्ता पाळायला शेपरेट ट्रेनिंग घेतल्याली मानसं ठेवल्यात हे कळल्यावर सगळेच बिंदास्त झाले.  कोल्हापूर संस्थानात तवा, बालेखॉं चित्तेवान,  सरदारखॉं चित्तेवान, चॉंदसाहेब चित्तेवान, रहिमान जमादार, धोंडी लिंबाजी पाटील, येकू बाळा घोरपडे, हनीफ बालेखॉं जमादार, बाबूलान उस्मान चित्तेवान, तुकाराम चेद्राप्पा बोडके, मोहीद्दीन बाबाजी शेख, बडे भाई, हुसेन रहिमान जमादार, आबालाल मीर फकीर, नारु शंकर मांग, कमाल अब्दूल चित्तेवान, बिरु रामा धनगर, नुरुल्लाखान हुसेनखान पठाण हे चित्तेवान हुते ज्यांच्यावर ३५ चित्ते सांभाळायची जबाबदारी हुती.

चित्तेवान…

महाराजांनी चित्त आणलं थक पण त्यांसनी सांभाळायला खायाला घालायला, काळजी घ्याला आणि चित्त माणसाळायला चित्त्यासनी ट्रेनिंग द्यायला लागणार हूत पण देणार कोण? त्यात भ्या पण लै. हुकुन चुकून अंगाबिंगावर आला की विषय क्लोजचं की पण महाराजांनी ह्यावर बी उपाय काढला. कोल्हापूरच्या एसटी स्टँड जवळचं विक्रम हायस्कूल हाय ना तिथं आधी चित्त्यासनी ठिवलं जायचं. तिथं तुमी आजबी गेला तरी चित्तेखाना तुमाना बघाय मिळल. बिबट्या आणि चित्ता दिसाय सारखे असले तरी त्यांच्यातला फरक तुमाना म्हायती असाला पायजे. बिबट्या रात्री शिकार करतो तर चित्ता दिवसा.

चित्त्याकडनं अशी केली जायची शिकार

शाहू महाराजांकड इतर कुठला शाही पावणा किंवा इंग्रज वगैरे आले तर त्यांच्यासाठी हमखास या खेळाचं आयोजन केलं जायचं. घोडागाडीतनं चित्ता शिकारीच्या माळावर आणला जायचा जितं काळवीटांचां कळप असलं अन् मंग चित्त्याला मोकळं सोडलं जायचं हे चित्ता पळायाचा पुढं आणि घोडागाडीतनं चित्तेवान चित्त्याच्या माग. चित्त्यानं झडप घालून काळवीट आडवं केलं की चित्तेवान चित्त्याला काळवीटापसनं येगळं करायचा. चित्त्याचा वापर फक्त शिकारीसाठी व्हायचा शिकार खायाच कोन हे येगळं इचारू नगा.

शाहू महाराजानंतर राजाराम महाराजांनी शिकारीचा छंद पुढं चालू ठेवला. स्टार, वीरमती, लक्ष्मी, गणप्या,  अशी चित्त्याची नावं हुती.  १९६० ला शेवटचा चित्ता मरण पावल्याची नोंदाय.

काळविटीच्या शिकारीची आजच्या काळातली प्रकरणं आपल्या कानावर येत असत्यात पण काळविटीच्या शिकारीसाठी चित्त वापरायचं आणि ते आफ्रिकेतनं आणून म्हणून  म्हणत्यात कोल्हापूरकरांचा नाद लै बाद.