माल खरा आहे की खोटा ? स्त्रीला हीन वागणूक देणारी प्रथा…

जगभरातल्या स्त्रियांचा विचार केला तर स्त्रिया अनेक माध्यमातून भरारी घेताना दिसतात. अनेक क्षेत्रात भारतातल्या स्त्रियांनीही जबरदस्त कामगिरी करून देशाचं नाव मोठं केलं आहे. पण भारतातल्या काही समाजात मात्र स्त्रियांच्या वाट्याला आजही हीन वागणूकच येताना दिसते.

महाराष्ट्रातल्या काही भटक्या समाजांमध्ये विशेषतः कंजारभाट समाजात स्त्रियांना लग्नाच्या आधी कौमार्य सिद्ध करावं लागतं. लग्न ठरण्यापासूनच्या सगळ्याच पद्धती स्त्र्रिला हीन आणि दुय्यम वागणूक देणार्‍या असतात.

लग्न झाल्यानंतर वधू आणि वर दोन्हीकडच्या कुटुंबांच्या सोबत जातपंचायत भरवली जाते. वधूच्या वडिलांकडून विवाहाला अधिकृत संमती आहे असा शिक्का मिळण्यासाठी जात पंचांना पैसे दिले जातात. या प्रथेला ‘खुशी’ म्हणतात.

या प्रथेनंतरची प्रथा असते, कौमार्य चाचणीची. लग्नानंतरची पहिल्या रात्री जात पंचायत बसते. वधू आणि वराची इथे कसून चौकशी केली जाते. ब्लेड किंवा कोणतीही धारदार वस्तु दोघांकडेही नाही याची खात्री करून वराकडे एक पांढराशुभ्र रुमाल किंवा कापड देऊन दोघांनाही एका बंद खोलीत पाठवलं जातं. शरीरसंबंधादरम्यान लाल डाग कपडावर पडला तरच विवाह ‘खरा’ मानला जातो. या दरम्यान वापरली जाणारी भाषा मात्र फार वेगळी असते.

जातपंचांकडून खोलीतून बाहेर आलेल्या नवर्‍या मुलाला, “माल खरा आहे का ?’, विचारलं जातं. त्यानंतर कपड्यावरचा लाल डाग बघून लग्नाला संमती दिली जाते.

लग्नाआधीच स्त्रीचं कौमार्य भंगलं आहे का हे तपासण्यासाठी ही प्रथा आहे.  पण स्त्रीचं कौमार्य किंवा एंग्रजी भाषेत ज्याला व्हर्जिनीटी म्हटलं जातं ते अनेक करणांने भंगु शकते. सायकल चालवणं, विविध खेळ खेळण्यानंही कौमार्य भंग होतं, हे लक्षात घेतलं जात नाही.

विधवा पुनर्विवाहाला जरी या समाजाकडून मान्यता असली तरी स्त्रीला मात्र पुनर्विवाह असल्याने नेहमी दुय्यम वागणूक मिळत राहते. शिवाय जटपंचायतिकडून घेतले गेलेले सर्व नियम पळावेच लागतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या जातपंचायतीत कुणीही स्त्री सभासद नसतात. स्त्रियांना आपली बाजू मांडण्याचा अधिकारही या जातपंचायतीत नसतो.

आजचा समाज वेगात प्रगती करतोय. समाज सुधारलाय. स्त्री आणि पुरुषांच्या संमतीनं लागणाआधीही शरीरसंबंध येतात. संमतीने असलेल्या शरीरसंबधांना न्यायालयानेही संमती दिलेली असताना, ते नाकारण्याचा अधिकार कुणालाही नाही. अशा परिस्थितित स्त्रीला हीन वागणूक देणार्‍या अशा प्रथा थांबायला हव्या.